हळद लागवड आणि कीड व्यवस्थापन | Turmeric Cultivation in Marathi

भारतात मसाल्यांमध्ये हळद एक महत्वपूर्ण मसाला पीक म्हणून ओळखतात. हळदीची लागवड ही १५ मे ते जूनच्या पहिल्या आठवड्यात केल्यास उत्पादन चांगले मिळते. चांगले उत्पादन मिळण्यासाठी लागवडीपूर्वी शास्त्रीय दृष्टिकोनातून जमिनीची पूर्वमशागत करणे अतिशय आवश्यक असते. Turmeric Cultivation in Maharashtra

जमिनीची मशागत कशी करावी?

  • जमिनीचा सामू म्हणजेच ph हा ६.५ ते ७.५ च्या दरम्यान असावा.
  • सेंद्रिय कर्बाचे प्रमाण ०.५ % टक्केपेक्षा जास्त असावे.
  • जमिनीची खोली ही २५ ते ३० सें.मी. असावी.
  • कंद चांगले पोसण्यासाठी जमिनीमध्ये हवा खेळती राहणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यासाठी जमिनीची उभी – आडवी एक फूट खोल नांगरणी करावी.
  • दोन नांगरणीमधील अंतर हे कमीत कमी १५ दिवसांचे ठेवावे. त्यासाठी जमिनीची उभी-आडवी एक फूट खोल नांगरणी करावी.
  • जमिनीचा पोत चांगला राखण्याच्या दृष्टीने द्विदल किंवा हिरवळीची पिके  गाडून जमिनीची पूर्वमशागत करावी. भारी, काळ्या चिकण आणि क्षारयुक्त जमिनीत हळदीचे पीक चांगले येत नसते, त्यामुळे अशा जमिनी शक्यतो हळद लागवडीसाठी टाळाव्यात.
  • जमिनीमधील लव्हाळा, हराळी यांसारख्या बहुवर्षीय तणांचे अवशेष मुळांसह काढून जाळून त्यांना नष्ट करावेत.तसेच अगोदरच्या पिकाच्या काश्या वेचून घ्याव्यात.
*हे पण वाचा :- नॅनो लिक्विड यूरिया (Nano Liquid Urea)

बेण्याची निवड कशी करावी?

  • बेण्याची सुप्तावस्था ही संपलेली असावी.
  • बेण्यावरील एक ते दोन डोळे चांगले फुगलेले असावेत.
  • मातृकंद बेणे ५० ग्रॅमपेक्षा जास्त वजनाचे, बगल गड्डे किंवा अंगठा गड्डे ४० ग्रॅमपेक्षा जास्त वजनाचे, तर हळकुंडाचे वजन हे 30 ग्राम पेक्षा जास्त असावे.
  • बेणे रोगमुक्त व कीडमुक्तच वापरावे.
  • बेण्याची उगवण एकसारखी होण्यासाठी लागवडीच्या पूर्वी किमान  १५ दिवस अगोदर बेण्यावरती पाणी मारावे.
  • बेण्यास कंदकुजीचा प्रादुर्भाव झाला असल्यास बेणे मऊ पडते. असे मऊ बेणे कापले असता आतमधील भाग कापसासारखा दिसतो. असे बेणे उगवत नाही.
  • मातृकंद बेणे त्रिकोणाकृती असावे. बेण्यामध्ये इतर जातींची भेसळ नसावी. बेण्यावरील मुळ्या, गतवर्षीच्या पानाचे अवशेष साफ करून त्यांना स्वच्छ करून घ्यावे.

हळदीची बियाणे

हळदीची लागवड करतांना तीन प्रकारचे बियाणे प्रामुख्याने वापरतात

1) मातृकंद किंवा जेठा गड्डे बियाणे

या प्रकारचे बियाणे हे मुख्य रोपाच्या खाली जे कंद तयार होतात त्यास मातृकंद किंवा जेठा गड्डे बियाणे म्हणतात. याचे वजन ५० ग्रॅमपेक्षा जास्त असावे. या प्रकारचे एका एकरात ११ ते १२ क्विंटल बियाणे लागते.

2) हळकुंड

ओली हळकुंडेही बियाणे म्हणून वापरता येतात; परंतु त्यांचे वजन हे ३० ग्रॅमपेक्षा जास्त असावे. या प्रकारचे एका एकराला ९ ते १० क्विंटल बियाणे लागते. सुरवातीला बियाणे तयार करण्याच्या दृष्टीने या प्रकारचे बियाणे उत्तम आहे, परंतु मातृकंदापासून मिळणारे उत्पन्न हे हळकुंडापासून मिळणाऱ्या उत्पादनापेक्षा १५ ते २० टक्के जास्त असते.

3) बगल गड्डे किंवा अंगठा गड्डे

मुख्य रोपाच्याबाजूला जे फुटवे येतात, त्याच्या खाली जे कंद तयार होतातत्यालाच बगल गड्डे किंवा अंगठा गड्डे असे म्हणतात. या कंदाचे वजन ४० ग्रॅमपेक्षा जास्त असावे. या प्रकारचे एका एकराला १० क्विंटल बियाणे लागते.

*हे पण वाचा :- पंजाब डख हवामान अंदाज जुन २०२१

हवामान आणि लागवड

बदलत्या हवामानाचा हळदीच्या पिकाच्या वाढीवर फारसा परिणाम होत नाही. हळद हे किमान नऊ महिन्यांचे पीक असते आणि याची लागवड विभागानुसार आणि पाण्याच्या उपलब्धतेनुसार मे महिन्याच्या सुरवातीपासून जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत करता येते. महाराष्ट्रामध्ये सर्वसाधारणपणे अक्षय तृतीयेला हळदीची लागवड करतात. हळदीचे कंद जमिनीमध्ये साधारणतः एक फूट खोलीवर वाढतात. त्यामुळे एक फूट खोलीवरील मातीपरीक्षण केल्यास फायदेशीर ठरते.

खताचे व्यवस्थापन

कुळवाच्या गरजेप्रमाणे एक ते दोन पाळ्या देऊन शेवटच्या पाळी अगोदर एकरी १० ते १२ टन चांगले कुजलेले शेणखत पसरावे. सद्यःस्थितीमध्ये शेणखताची मात्रा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणे अशक्य झाले आहे. त्यामुळे शेणखताबरोबर इतर सेंद्रिय खतांचा सुद्धा वापर करावा. सेंद्रिय खतामध्ये प्रामुख्याने गांडूळखत, कंपोस्ट खत, मासोळीचे खत, हाडांचा चुरा, प्रेस मड कंपोस्ट, वेगवेगळ्या पेंडींचे मिश्रण याचा वापर करावा. हळदीसाठी शक्यतो ओल्या मळीचा वापर करणे टाळावा. जमीन तयार करतेवेळी एकरी २५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि ८० किलो म्युरेट ऑफ पोटॅश या खतांचा वापर करावा.

हळदीच्या सुधारित जाती

खाली काही हळदीच्या सुधारित जाती दिल्या आहेत.

1) फुले स्वरूप हळद

हळदीची ही जात महात्मा फुले कृषी विद्यापीठाने प्रसारित केली असून सदर जात ही मध्यम उंच वाढणारी अशी आहे. सरळ वाढीची सवय असून पानांचा रंग हिरवा असून क्रियाशील पानांची संख्या ६ ते ७ असते. या जातीचा पक्क्तेचा काळ हा ८.५ महिन्याचा असून फुटव्यांची संख्या २ ते ३ प्रति झाड असते. या जातीचे जेठे गड्डे मध्यम आकाराचे असून वजनाचे ५० ते ५५ ग्रॅम असतात. हळकुंडे ३५ ते ४० ग्रॅम वजनाची असून प्रत्येक कंदात ७ ते ८ हळकुंडे असतात. त्यांनंतर त्यावर उपहळकुंडाची वाढ होत असते. मुख्य हळकुंडाची लांबी ७ ते ८ सें.मी. असते. बियाणे व उत्पादनाचे प्रमाण १:५ असे आहे. हळकुंडे सरळ लांब वाढतात.

*हे पण वाचा :- खताचे नवीन दर

हळकुंडाच्या गाभ्याचा रंग गर्द पिवळसर असा आहे. या जातीमध्ये पिवळेपणाचे प्रमाण सध्या प्रसारीत असलेल्या जातीपेक्षा जास्त म्हणजे ५.१९% इतके असून उतार २२% इतका मिळतो. या जातीने सरासरी ओल्या हळदीचे उत्पादन ३५८.३० क्विं./हे. दिल्याचे दिसून आले असून वाळलेल्या हळदीचे उत्पादन ७८.८२ क्विं./हे. हिल्याची नोंद आहे. या जातींमध्ये पानावरील करपा रोगास तसेच कंदमाशी या किडीस प्रतिकारक गुण असल्याचे दिसून आले आहे.

2) सेलम हळद

सेलम या जातींची पाने रुंद हिरवी असतात. पिकाच्या एकूण वाढीच्या कालावधीमध्ये १२ ते १५ पाने येतात. झाडास सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये १२ ते १५ पाने येतात. हळकुंडे व उपहळकुंडे जाड व ठसठशीत असतात. हळकुंडाची साल पातळ असून गाभ्याचा रंग केशरी पिवळसर असतो. हळकुंडावरील पेर्‍यांची संख्या ८ ते ९ असते. कच्च्या हळदीचे उत्पादन ३५० ते ४०० क्विंटल प्रती हेक्टरी मिळते. या जातीमध्ये कुरकुमीनचे प्रमाण ४.५ टक्के असते. वाळलेल्या हळदीचे ७० ते ७५ क्विंटल प्रती हेक्टरी उत्पादन मिळते. ही जात पक्क होण्यास ८.५ ते ९ महिने लागतात. चांगल्या कसदार पोताच्या जमिनीत या जातीच्या झाडांची उंची जवळजवळ ५ फुटांपर्यंत वाढते आणि ३ ते ४ फुटवे येतात. सध्या महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर व सोलापूर या जिल्ह्यामध्ये लागवड करण्यास महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. अहमदनगर यांनी या जातीची शिफारस केली आहे.

3) राजपुरी हळद

राजपुरी हळद या जातीची पाने रुंद, फिकट हिरवी व सपाट असतात. पिकाच्या वाढीच्या एकूण कालावधीमध्ये १० ते १८ पाने येतात. झाडास फुले क्वचित येतात. हळकुंडे व उपहळकुंडे आखूड व जाड ठसठशीत असतात. हळकुंडाची साल पातळ असून गड्ड्यांचा रंग पिवळा ते गर्द पिवळा असतो. शिजवल्यानंतर वाळलेल्या हळदीचा उतारा १८ ते २० टक्के पडतो व प्रती हेक्टरी कच्च्या हळदीचे उत्पादन ५५ ते ५८ क्विंटल मिळते. ही जात करपा रोगास बळी पडते. पक्क होण्यास ८ ते ९ महिने लागतात.

*हे पण वाचा :- जमीन मोजणी 

हळदीचे कीड नियंत्रण

1) कंदमाशी

माशीचे पाय शरीरापेक्षा लांब असतात. दोन्ही पंख पातळ व पारदर्शक असून त्यावर राखी रंगाचे ठिपके असतात. अंडी पांढरट रंगाची असतात.अळी पिवळसर असून त्यांना पाय नसतात. या किडीच्या अळ्या उघड्या गड्ड्यामध्ये शिरून त्याच्यावर उपजीविका करतात. याच्या नियंत्रणासाठी कंदमाशा शेतामध्ये दिसू लागताच माशा मारण्यासाठी क्विनॉलफॉस २५% प्रवाही २० मी.ली. १० लिटर पाण्यामध्ये मिसळून जुलै ते ऑगस्ट दरम्यान १ ते २ फवारण्या १५ दिवसांच्या अंतराने कराव्यात. याच किटकनाशकाचे पुढील २ हप्ते १ महिन्याच्या अंतराने ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये द्यावेत.अर्धवट कुजले, सडके बियाणे लागवडीस वापरू नये. जुलै ते सप्टेंबर या कालावधीमध्ये शेतात उघडे पडलेले गड्डे मातीने झाकून घ्यावेत.

2) पाणातील रस शोषून घेणारा ढेकूण

या किडीची पिल्ले पानाच्या पाठीमागे एकत्रितपणे आढळून येतात. ते पानाच्या पाठीमागे राहून पानातील रस शोषून घेतात. या किडींचा उपद्रव झालेली पाने तांबूस पिवळसर रंगाची दिसून येतात. मोनोक्रोटोफॉस ३६ डब्ल्यू. एस. सी. १० मिली १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.

3) पाने गुंडाळणारी अळी

हळद पिकावर ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून ते नोव्हेंबरच्या दुसर्‍या आठवड्यापर्यंत या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. या किडीची अळी हिरवट रंगाची असून ती अंड्यातून बाहेर पडल्यानंतर स्वत:च्या शरीराभोवती पान गुंडाळून घेते व आत राहून पाने खाते.किडीचा प्रादुर्भाव दिसताच गुंडाळलेली पाने गोळा करून नष्ट करावीत. तसेच कार्बारील ४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी करावी.

4) सूत्रकृमी

काही भागामध्ये या पिकावर सुत्रकृमींचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. पिकाच्या मुळाभोवती राहून सुईसारख्या अवयवाने मुळातील रस शोषण करतात. त्यामुळे पिकाची वाढ खुंटते व पाने पिवळी पडतात. तसेच यांनी केलेल्या छिद्रातून कंदकुजीस कारणीभूत असलेल्या बुरशींचा सहज शिरकाव होतो. सुत्रकृमीच्या नियंत्रणासाठी लागवडीच्या वेळी ट्रायकोडर्मा प्लस ५ किलो /हे. शेणखतात मिसळून द्यावा किंवा फोरेट १० जी. हेक्टरी २५ किलो याप्रमाणात द्यावे किंवा १८ ते क्विं/हे. लिंबोळी पेंडीचा वापर करावा.

*हे पण वाचा :- आजचे बाजारभाव

हळदीचे उत्पादन

हळदीचे उत्पादन हे वापरलेली जात, निरोगी बियाणे, दिलेली खते, जमिनीचा प्रकार यावर अवलंबून असते. सर्वसाधारणपणे ओल्या हळदीचे प्रति हेक्टरी २५० ते ३५० क्विंटल (+ २५ ते ३० क्विंटल गड्डे ) इतके उत्पादन मिळते. तसेच या ओल्या हळदीपासून ५८ ते ७५ क्विंटल वाळलेली हळद मिळते.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.