शेतकरी मित्रांनो, स्वतःची जमीन NA (बिनशेती) करणे म्हणजे सर्वसामान्यांसाठी किती मोठी डोकेदुखी असते, हे वेगळे सांगायला नको. सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवून अनेक महिने वाया जातात. पण आता राज्य शासनाने असा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, ज्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आणि जमीन मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महसूल विभागाने काढलेल्या नवीन परिपत्रकानुसार, आता गावठाण हद्दीपासून २०० मीटरच्या आतील जमिनींना अकृषिक (NA) परवानगी घेण्याची कोणतीही आवश्यकता नसणार आहे. १३ एप्रिल २०२२ रोजी शासनाने याबाबतचे अत्यंत महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. नेमका हा निर्णय काय आहे आणि याचा फायदा कुणा-कुणाला होणार? हे आपण सोप्या भाषेत समजून घेऊया.
नेमका बदल काय झालाय?
पूर्वी कोणतीही शेतजमीन घर बांधण्यासाठी किंवा व्यवसायासाठी वापरायची असेल, तर त्यासाठी किचकट NA प्रक्रियेतून जावे लागत होते. पण आता, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ४२ (ब), (क) आणि (ड) मध्ये बदल करण्यात आला आहे. महसूल विभागाचे सहसचिव रमेश चव्हाण यांनी राज्यातील सर्व तहसील कार्यालयांना या नवीन बदलाची अंमलबजावणी करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
याचा सरळ अर्थ असा की, जर तुमची जमीन गावाच्या, नगराच्या किंवा शहराच्या हद्दीपासून (गावठाण हद्दीपासून) २०० मीटरच्या आत असेल, तर तुम्हाला रहिवासी, व्यावसायिक किंवा औद्योगिक वापरासाठी स्वतंत्र बिनशेती परवानगीची गरज पडणार नाही.
तहसील कार्यालयाकडून आता कशी कार्यवाही होणार?
या नवीन नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी तहसीलदारांना काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत:
- जमिनींचे वर्गीकरण: गावठाण हद्दीपासून २०० मीटरच्या परिघात असलेल्या जमिनींची एक यादी तयार केली जाईल. यात जमिनीचा गट नंबर आणि सर्वे नंबर नोंदवून, ती जमीन ‘वर्ग १’ (Class 1) आहे की ‘वर्ग २’ (Class 2) हे निश्चित केले जाईल.
- वर्ग १ च्या जमिनींसाठी नियम (Class 1 Land): जर तुमची जमीन वर्ग १ ची असेल, तर तुमचे काम अगदी सोपे झाले आहे. शासनाने निश्चित केलेला रूपांतरित कर (Tax) आणि अकृषिक आकारणी भरली की, जमीन मालकांना रीतसर ‘सनद’ (प्रमाणपत्र) दिले जाईल.
- वर्ग २ च्या जमिनींसाठी नियम (Class 2 Land): जर जमीन वर्ग २ मध्ये येत असेल, तर त्यासाठी शासनाचे काही अधिमु्ल्य (नजराणा) देणे बाकी आहे का? हे तपासले जाईल. भोगवटदाराने हे शासकीय देणे भरल्यानंतर, जिल्हाधिकारी कार्यालयाचा अभिप्राय घेऊन परवानगी दिली जाईल.
प्रक्रिया आता अधिक पारदर्शक आणि वेगवान!
खरंतर, १८ मार्च २०१८ रोजी शासनाने एक GR काढून गावठाण हद्दीजवळील २०० मीटरच्या आतील लोकांसाठी अकृषिक वापराची प्रक्रीया सुलभ करण्याचे निर्देश दिले होते. पण आता १३ एप्रिल २०२२ च्या या नव्या परिपत्रकामुळे या कामाला खऱ्या अर्थाने गती मिळणार आहे आणि लालफितीच्या कारभाराला आळा बसणार आहे.
तुमची किंवा तुमच्या नातेवाईकांची जमीन जर गावठाण हद्दीजवळ असेल, तर त्यांच्यासोबत ही महत्त्वपूर्ण माहिती नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांनाही या नवीन नियमाचा फायदा घेता येईल.