राज्यातील विविध भागात पुढील तीन ते चार तासात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे.
प्रादेशिक हवामान विभाग मुंबईनं राज्यातील विविध भागात पुढील तीन ते चार तासात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह आणि विजांचा कडकडाट, वेगवान वाऱ्याची आणि पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. राज्यात गेल्या चार दिवसापासून विविध ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावलीय. गेल्या चार दिवसात सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर. या जिल्ह्यात पावसाचा शेतकऱ्यांना चांगलाच तडाखा बसलाय, मात्र अजूनही 7 मे पर्यंत हवामान विभागानं वादळी वाऱ्यासह जोरदार पूर्व मोसमी पावसाचा इशारा दिला आहे.
राज्यात पाऊस कुठे होणार?
प्रादेशिक हवामान विभाग मुंबईनं मेघगर्जनेसह आणि विजांचा कडकडाट, वेगवान वाऱ्याची आणि पावसाची शक्यता वर्तवली आहे. या अंदाजानुसार सातारा, सांगली, पुणे, अहमदनगर, उस्मानाबाद, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात पाऊस हजेरी लावू शकतो.
हवामान विभागाचं ट्विट
वाशिममध्ये पावसाची हजेरी
वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी पूर्वमोसमी पाऊस सुरू झाला आहे. वाशिममधील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. मान्सुनपूर्व पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. पावसामुळे शेतात काढणीला आलेल्या अनेक पिकांचे नुकसान झाले. फळबागांचे नुकसान होत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
गारपीट होण्याचा अंदाज
दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या भागावर चक्रीय चक्रवात निर्माण झाल्यानं मध्य महाराष्ट्रासह, मराठवाड्यात 7 मे पर्यंत गारपीटीसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय.हवामान विभागानं 7 मेपर्यंत महाराष्ट्रातील विविध भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. शेतकऱ्यांनी पावसाच्या दृष्टीने गोळा केलेल्या पिकांवर आच्छादन टाकणं गरजेचं आहे. विजांचा कडकडाट आणि पाऊस यापासून होणाऱ्या नुकसानापासून वाचण्यासाठी शेतकऱ्यांनी सतर्कता बाळगावी, असं आवाहन हवामान विभागानं केलं आहे.
वीज कोसळत असल्यानं काळजी घेण्याचं आवाहन
राज्यात 7 मेपर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यासह पुणे घाटमाथ्यावर विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलीय, मात्र, या काळात वीज कोसळण्याचं प्रमाण जास्त असतं आणि त्याची तीव्रता जास्त असल्यानं जीव जाण्याचं प्रमाण आहे, त्यामुळे ढगाळ वातावरणानंतर विजा कडकत असताना मोकळ्या वातावरणात न फिरण्याचं आवाहन पुणे हवामान वेधशाळेनं केलंय.